सिल्लोड आगाराकडून ज्यादा बसची व्यवस्था
सिल्लोड, (प्रतिनिधी) : प्रवाशांची मोठी गर्दी वाढली आहे. त्यामुळे सिल्लोड आगाराच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याची माहिती आगार प्रमुख विजयकुमार काळवणे यांनी दिली आहे.
बसस्थानकावर आपापल्या गावी जाण्यासाठी दीपावली सणाच्या निमित्ताने प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मागील चार दिवसांपासून सिल्लोड आगाराच्या वतीने लांब पल्याच्या मार्गावर जादा बसेस सोडल्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची सोय झाली.
प्रवाशांच्या वाढलेल्या संख्येमुळे सिल्लोड आकाराच्या दैनंदिन उत्पन्नात मोठी वाढ झाली. दररोज आगाराला नियमित पाच लाखाचे उत्पन्न मिळत असताना मागील चार दिवसांपासून साडेसात लाख रुपयाचे दररोजचे आकाराचे उत्पन्न झाले आहे. याशिवाय ज्यादा बसेस सोडल्यामुळे बसस्थानकावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. अनेक वेळा बसेस उपलब्ध
राहत नसल्याने प्रवासी खाजगी वाहनांकडे वळत असत परंतु यंदा सिल्लोड एसटी आगाराच्या वतीने
प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन पुणे, नाशिक, जळगाव, भुसावळ, बुलढाणा व छत्रपती संभाजीनगर या मार्गावर जादा बसेस सोडल्या आहेत. नीटनेटके नियोजन केल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय टाळता आली आहे.
सध्या शाळांना सुट्ट्या लागलेल्या असल्याने शाळेसाठी चालविण्यात येणाऱ्या सर्व फेऱ्या बंद आहेत. या मार्गावर चालणाऱ्या बसेस ज्यादा बसेस साठी आम्हाला उपयोगात आल्या. याशिवाय ग्रामीण भागातील सर्व फेऱ्या नियमित सुरू ठेवल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची ही गैरसोय टाळता आली.
- विजयकुमार काळवणे, आगार प्रमुख, सिल्लोड















